जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणाने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला मोबाईल लांबवल्याची घटना दि. २८ रोजी घडली होती. हा मोबाईल चोरणारा संशयित आरोपी ओंकार योगेश सोनवणे (रा. रिधूर वाडा) याला याच्या शनिपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुनंदिनी पार्कमध्ये सागर राजेश गवळी हा तरुण वास्तव्यास आहे. त्याच्याकडे (एमएच १९, डीवाय ६६४८) क्रमांकाची दुचाकी आहे. दि. २८ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मरीमाता मंदिराजवळ मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथून वरात आलेली असल्याने त्यांना भेटण्यासाठी सागर गवळी हे गेले होते. यावेळी त्यांनी मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला होता. नातेवाईकांना भेटून आल्यानंतर ते दुचाकीजवळ गेले असता, त्यांना संशयित ओंकार सोनवणे हा त्यांच्या दुचाकीच्या मोबाईल बॉक्स मध्ये ठेवलेला मोबाईल चोरुन नेत असतांना दिसला. सागर गवळी यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तपास करून संशयित आरोपी ओंकार सोनवणे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनके, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने हि कारवाई केली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.