तिघांवर गुन्हे दाखलकरुन कारवाईची मागणी ; माहिती अधिकार कार्यकर्ते कॉ.अनिल नाटेकर यांनी केली आहे

जळगाव (प्रतिनिधी) – तत्कालिन नगरपालिकेच्या भरती व पदोन्नत्या संदर्भांत झालेल्या विशेष लेखा परिक्षण अहवालात तत्कालिन नगराध्यक्ष प्रदिप रायसोनी व मुख्याधिकारी पी.डी.काळे आणि मुख्याधिकारी एल.एस.कोळी हे मुख्याधिकारी यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे सदर दोषींवर तिघांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन कारवाईसाठी प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कॉ.अनिल नाटेकर यांनी महापौर, मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
तत्कालिन नगरपालिकेने सन १९९२-९३ ते १९९७ या कालावधित केलेली कर्मचारी भरती आणि पदोन्नत्याचे विशेष लोखा परिक्षण करण्यात आलेले असून तसा अंतिम अहवाल नुकताच मनपा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे. सदरचा अहवाल माहिती अधिकार कार्यकर्ते कॉ. अनिल नाटेकर यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केलेला असून सदर अहवालाचे अवलोकन केले असता अहवालात आक्षेपार्ह नोंदी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अनेक प्रकारच्या त्रृटी नमूद करण्यात आल्या असून शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आलेले आहे. या अहवालात कर्मचारी भरती व पदोन्नत्यां संदर्भात तत्कालिन मुख्याधिकारी पी.डी.काळे, एल.एस.कोळी आणि तत्कालिन नगराध्यक्ष प्रदिप रायसोनी यांना दोषी धरण्यात आले आहे. त्यामुळे अहवालात दोषी आढळून आलेल्या तिघांवर मनपा प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करुन कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकारी कार्यकर्ते कॉ. अनिल नाटेकर यांनी महापौर जयश्री महाजन व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे केली आहे.







