प्रथम नगरसेवक झालेल्यांना संधी नकोच ; प्रामाणिक कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी
जळगाव प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षामध्ये महापौर पदासाठी मोठी खलबते सुरू आहेत. पक्षाचे नेते ना. गिरीश महाजन, शहराचे आ.राजूमामा भोळे यांच्याकडे अनेक इच्छुक मंडळी हे भेटी घेत आहेत. मात्र पक्षातील ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्त्याला संधी न मिळाल्यास पक्षात पुन्हा बंडाळी उफाळून येण्याची शक्यता भाजपाच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाने महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण ४७ उमेदवार उभे केले होते. मात्र एका उमेदवाराला एबी फॉर्म बाद झाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. अखेर हे अपक्ष उमेदवार पराभूत झाले. मात्र उर्वरित कमळ चिन्हावरील ४६ उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे ही निवडणूक भाजपाने महायुती म्हणून मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत लढवली. यामुळे अनेक नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले निष्ठावान, जुने कार्यकर्ते यांना तिकीट न मिळाल्याने त्यांची निराशा झाली. ही नाराजी शहराचे निवडणूक प्रमुख आ.राजूमामा भोळे यांच्याकडे अक्षरशः धाय मोकलून रडत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.
अखेरीस तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. या कार्यकर्त्यांमुळे महायुतीचे उमेदवार पडतील अशी भीती व्यक्त करत महायुतीमधील इतर मित्र पक्षांनी भाजप पक्षांकडे दबाव आणला. त्यामुळे भाजपाने ३० जणांची पक्षातून हकालपट्टी केली होती. एकाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने हकालपट्टी मागे झाल्याची माहिती प्राप्त झाली. हकालपट्टीमुळे भाजपामध्ये पुन्हा एकदा नाराजीचे वातावरण पसरले होते.
त्यातच आता महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये ओबीसी महिला या प्रवर्गामध्ये दावेदार असणाऱ्या निष्ठावान आणि जुन्या महिला कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली नाही तर पुन्हा एकदा भाजपमध्ये बंडाळी उफाळून येऊ शकते अशी दाट शक्यता भाजपच्या गोटातून व्यक्त झालेली आहे. यापूर्वी देखील महापालिकेच्या हातात ५७ नगरसेवक असूनही सत्ता गमवण्याची वेळ आली होती. हा कित्ता पुन्हा गिरवला जाऊ शकतो की काय अशी स्थिती आता अंतर्गत दिसून आली आहे.
भाजपला भावी बंडाळी टाळण्यासाठी अनुभवी व्यक्तीला महापौरपदी संधी द्यावी लागणार आहे. हीच एकमुखी मागणी भाजपामधील निष्ठावान, जुन्या व अनेक वर्षांपासून सक्रियपणे निस्वार्थी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त झालेली आहेत. पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या महिला नगरसेवकांना महापौरपदासह इतर सभापती निवडीमध्ये संधी नको अशी मागणी आता या कार्यकर्त्यांनी केलेली असल्याची खात्रीलायक माहिती “केसरीराज”कडे प्राप्त झालेली आहे.








