गुन्हेगार तरुणाचा सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव (प्रतिनिधी) – चोपडा शहरातील महिलेचा मोबाइल लांबवून नंतर त्यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट काढून त्यातील फोटोंचा गैरवापर करीत फसवणूक करणाऱ्या २६ वर्षीय भामट्याला सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी २० रोजी चोपडा तालुक्यातील गोरगावले येथून अटक केली आहे.
चोपडा येथे राहणाऱ्या विवाहित महिलेचा मोबाइलला अज्ञात चोरट्याने १४ जुलै रोजी राहत्या घरातून चोरून नेला होता, त्यानंतर या महिलेच्या नावाने कोणीतरी बनावट फेसबुक खाते तयार करून त्यावर फिर्यादी महिलेचे मोबाईलमधील फोटो वापरून फेसबुकच्या प्रोफाईलवर ठेवले होते, तसेच इंस्टाग्राम या साईटवर फिर्यादी महिलेच्या फोटोचा गैरवापर करत बनावट खाते तयार करत तिच्या ओळखीच्या व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती महिलाच असल्याचे खात्यावर भासवत चॅट करीत असल्याचे भासवून फिर्यादी महिलेची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी हा प्रशांत जगन वारडे (वय-२६) रा. मु.पो. गोरगावले, ता. चोपडा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलीस स्थानकाचे पोनि. बळीराम हिरे यांनी पोलीस कर्मचारी सचिन सोनवणे, अरविंद वानखेडे यांना त्याचा शोध घ्यायला सांगितले. या कर्मचाऱ्यांनी गोरगावले येथून २० ऑक्टोबर रोजी संशयित प्रशांत वारडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइल फोन आणि चार सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर चोपडा पोलीस स्टेशन आणि गुजरात मधील सुरत येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे.







