जळगाव (प्रतिनिधी ) – भाषा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहेत. भाषा ही लवचिक देखील असते म्हणून ती विविध भाषांच्या शब्दांना आपल्यामध्ये सामावून घेते त्यातून तिचा विचार होतो. भारतामध्ये हिंदी ही संविधान संमत राजभाषा आहे सोबतच ती अशी भाषा आहे जिच्या माध्यमातून आपण संपूर्ण देशात अन्य भाषिक लोकांशी विचारांचे भावनांचे आदानप्रदान करू शकतो. भारतीय जनतेने या भाषेला राष्ट्रभाषा मानलेले आहे. भाषा, लिपी आणि लिखित साहित्याची सुदीर्घ परंपरा आहे. असे जरी असले तरी आज एक वेगळे जग आपल्या समोर आहे. २१ व्या शतकात नवनवीन आव्हाने आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्या भाषा सुद्धा सक्षम असल्या पाहिजेत. वैश्विकरण आजचा परवलीचा शब्द बनलेला दिसतो. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात मानवाचे जीवन संदर्भ बदलतांना आपण रोज पाहतो. म्हणून या बदलाच्या आधुनिक काळात आपल्याला भाषा आणि साहित्याविषयी दृष्टीकोण बदलावा लागेल. हिंदी भाषा हे रोजगाराचे साधन म्हणून किती सक्षम आहे याची कल्पना विद्यार्थ्यांना द्यावी लागेल आणि संवाद माध्यम, संचार माध्यम, प्रशासन, व्यापार जगत,चित्रपट जगत, टेलिव्हिजन मालिका, अनुवाद, इंटरनेट या क्षेत्रातील वेगवेगळ्या संधीविषयी तयार करावे लागेल.” असे विचार मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हिंदी विभागाने १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.कृष्णा गायकवाड (हिंदी विभाग प्रमुख, श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांनी प्रकट केले.
मू.जे.च्या भाषा प्रशाळेचे संचालक डॉ.भूपेंद्र केसुर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक भारताला एकात्म राखण्याचे जे काम हिंदी भाषेच्या माध्यमातून झाले आहे, त्यावर प्रकाश टाकला. सोबतच आपण विविध भाषा शिकल्या पाहिजेत आणि शब्द संपदा वाढवली पाहिजे असा संदेश सुद्धा दिला. प्राजक्ता बिऱ्हाडे, अनिता प्रजापत आणि प्राची या विद्यार्थिनींनी हिंदी भाषेचा विकास, या भाषेचे साहित्यिक सौंदर्य आणि व्यवहारामध्ये हिंदी भाषेचे महत्व यावर आपले विचार प्रकट केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.रोशनी पवार यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा.विजय लोहार यांनी केले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.