जळगाव तालुक्यात उमाळा फाटा येथे घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील उमाळा फाटा येथे भरधाव मिक्सर ट्रकने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
साहिल शेख मोहम्मद खाटीक (वय १९, रा. तांबापुरा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, ४ बहिणींसह राहत होता. मासेविक्रीचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन) दरम्यान, शनिवारी दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी साहिल शेख हा माशांच्या दुकानासाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायला जळगाववरुन नेरीकडे निघाला होता. कुसुमबा गाव ओलांडल्यावर उमाळा फाट्याजवळ मिक्सर ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात साहिल शेख हा जागीच मृत्युमुखी पडला.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी पोलिसांसोबत साहिलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. रुग्णालयात साहिलच्या कुटुंबीयांनी व मित्रांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तरुणाच्या अपघाती मृत्यूने तांबापुरा येथे शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.