शिरसोली शिवारातील धरणात आढळलेल्या मृतदेहाप्रकरणी दोघांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील नेव्हरे धरण परिसरात पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एल अँड टी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या निलेश राजेंद्र कासार (वय ३०, रा. दत्त चैतन्य नगर, पाचोरा रोड, ता. जामनेर) याची मित्रांनीच संगनमताने हत्या केल्याची फिर्याद वडील राजेंद्र कासार यांनी दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता निलेश याने वडिलांशी फोनवर बोलताना तो मित्र दिनेश आनंदा चौधरी (रा. शिरसोली) याच्याकडे जात असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर ७.१५ वाजल्यापासून त्याचा मोबाईल बंद येऊ लागला. घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता १६ डिसेंबर रोजी रामदेववाडी शिवारात पाण्याच्या तळ्याजवळ निलेशची मोटारसायकल आढळून आली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, १९ डिसेंबर रोजी पोलिसांनी निलेशचे वडील व त्याचे काका यांना नेव्हरे धरण परिसरात बोलावले. तेथे धरणात तरंगणारे एक पोते बाहेर काढल्यानंतर त्यात निलेशचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ओळख पटल्याने कुटुंबीयांचा आक्रोश झाला. वडील राजेंद्र कासार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निलेशचा मित्र दिनेश चौधरी व भुषण बाळू पाटील (दोन्ही रा. शिरसोली) यांच्याशी पूर्वी किरकोळ वाद होता. त्याच वादातून दोघांनी संगनमत करून निलेशचा खून केला व मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात बांधून नेव्हरे धरणात टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तपास वेगाने सुरू केला आहे.
भांडणाची ठेवली खुन्नस
दरम्यान या तिघांमध्ये एकाच कंपनीमध्ये काम करीत असल्याने मैत्री निर्माण झालेली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून मयत निलेश कासार आणि भूषण बाळू पाटील यांच्यामध्ये वाद झाले होते. या वादातून झालेल्या भांडणामध्ये भूषण पाटील यानी मनात खुन्नस ठेवलेली होती. निलेशने हे भांडण विसरले. मात्र भूषण पाटील यांच्या मनामध्ये अजूनही राग धुमसत होता.(केसीएन) यामुळेच भूषणने नियोजनबद्ध कट रचून निलेश कासार याला शिरसोली येथील शिवारात बोलावून त्याची गळा दाबून हत्या केली पुरावे मिळू नये म्हणून मृतदेह धरणात फेकल्याचे आता फिर्यादीनुसार उघड झाले आहे.








