पिंपळगाव पोलिसांची कारवाई, पाचोरा तालुक्यात घडली होती घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : मित्राला चाकूने जखमी करून त्याच्याकडील ५४ हजाराची रोकड लांबविणाऱ्या तरुणाला त्याच्या गावातून अटक करण्यात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला यश आले आहे. त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एकाच कंपनीत काम करणारे दोन मित्र दुचाकीवरुन जात असतांना एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या मानेवर चाकू लावून त्याला जखमी करत त्यांच्याजवळ असलेले ५४ हजार रुपये हिसकावून घेत घटनास्थळावरुन पळ काढला होता. (केसीएन)ही धाडसी चोरीची घटना १७ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी घडली होती. बांबरुड रस्त्यावर असलेल्या लोहारा सबस्टेशनजवळ ही घटना घडल्यानंतर दि. १८ जानेवारी रोजी अजय वासुदेव बोधडे (रा. वसाडी ता, नांदुरा हल्ली मुक्काम एरंडोल) यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना घडल्यापासून संशयित आरोपी फरार झाला होता. पिंपळगाव हरेश्वर पोलीस या फरार आरोपीच्या शोधात असतांनाच सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी रोहित सुधाकर चौधरी (वय वर्षे २३) हा त्याच्या रहात्या गावी पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक फौजदार अरविंद मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, प्रमोद वाडीले यांनी कळमसरा गावत साफळा रचुन चोरीच्या गुन्ह्यातील संशयित फरार संशयित आरोपी रोहित सुधाकर चौधरी याला ताब्यात पोलीस कस्टडीत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, ७० हजार रुपये किंमतीची पल्सर कंपनीची मोटारसायकल, तसेच फिर्यादी कडून हिसकावून घेतलेल्या ५४ हजार रुपये रोख रकमेपैकी ३० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सहाय्यक फौजदार अरविंद मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, प्रमोद वाडीले, अतुल पवार, दिपक अहिरे, योगेश भिलखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अरविंद मोरे हे करीत आहेत.