एकाला अटक, दोघांचा शोध सुरू!
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल साई गार्डन बाहेर डोळ्यात मिरची पूड टाकून आणि कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करून एका तरुणाला गंभीर जखमी केले. या घटनेतील एका संशयिताला तालुका पोलिसांनी अटक केली आहे
दि २७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत तालुका पोलिसांनी तीन संशयितांची नावे निष्पन्न केली असून, त्यापैकी एकाला सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
जळगाव शहरातील शाहूनगर येथील रहिवासी सय्यद जावेद सय्यद अजीज (वय- ३०) आणि त्याचा मित्र याकूब खान दाऊद खान (वय-४०) हे २७ ऑक्टोबर रोजी जेवणानंतर घरी जाण्याच्या तयारीत होते. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल साई गार्डनच्या बाहेर दोन मोटरसायकलवर आलेल्या चार तरुणांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. झोंबाझोंबी करत त्यांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही हाती न लागल्याने आरोपींनी धारदार कोयत्याने सय्यद जावेद सय्यद अजिज याच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात सय्यद जावेद सय्यद अजीज याच्या पाठीवर, डोक्यापासून ते कमरेपर्यंत मोठी गंभीर जखम झाली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याला ४० टाके पडले. सध्या त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर तालुका पोलिसांत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला.
उपनिरीक्षक विजय पाटील यांच्यासह गुन्हेशोध पथकाने तब्बल वीस दिवस सलग तपास करून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केली. अटक आरोपी: तौसिफ ऊर्फ चरबी सैय्यद आसिफ (रा. पिंप्राळा हुडको आझाद नगर).पोलिसांच्या तपासानुसार, या हल्ल्यात इम्मा ऊर्फ इम्रान भिस्ती (रा. शाहूनगर) आणि तांबापुरातील डेअरींग नावाचा एक तरुण यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. फरार असलेल्या या दोन्ही संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.








