मध्यप्रदेशातून सिल्लोड येथे कत्तलीसाठी जाणारे कंटेनर पकडले !
२४ गुरांची सुटका ; दोघांना अटक ,म्हसावद येथे पोलिसांची कारवाई
जळगाव / म्हसावद (प्रतिनिधी) – मध्यप्रदेशातून सिल्लोड येथे कत्तलीसाठी गुरांना ट्रकमध्ये अत्यंत निर्दयीपणे वाहनात कोंबून यात तब्बल २५ गुरे बांधलेल्या अवस्थेत घेऊन जाणारे वाहन म्हसावद जवळ गोवंश रक्षकांनी बुधवारी रात्री पकडून यातील २५ गुरांची सुटका केली तर यातील एका गुरांचा गुदमरून मृत्यू झाला . सर्व गुरांना बाफना गोशाळेत रवाना करण्यात आले असून याप्रकरणी आयशर कंटेनरच्या चालक आणि क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रेल्वे गेटजवळ मध्य प्रदेशातून सिल्लोड येथे गुरांना कोंबून घेऊन जाणारे वाहन बंद पडले. यावेळी संशयास्पद हालचाली दिसून आल्याने गावातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी अधिक तपासणी केली असता गुरे वाहनात कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली.तात्काळ एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावातील गोरक्षकांनी थांबवून ठेवलेला तपकिरी रंगाचा आयशर ट्रक क्रमांक आरजे ०९- जीई ५६०७ पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतला. वाहनातील चालक गुलाब उमर मधारीया (वय २९ ) व रज्जब युसुफ गोता (वय २५, दोन्ही रा. मुलतापुरा, ता. मदसोर, जि. मध्यप्रदेश) यांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आला .
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल वाघ यांच्या पथकाने चालक आणि क्लिनरची चौकशी केली असता चौकशीअंती त्यांनी गोवंश मध्यप्रदेशातून सिल्लोड येथे कत्तल करण्यासाठी नेत असल्याचे कबूल केले. मात्र वाहतुकीचा परवाना, कत्तल परवाना किंवा कोणती ही वैध कागदपत्रे त्यांच्या जवळ आढळली नाहीत.
कंटेनरची तपासणी केल्यावर गोवंश जातीची जनावरे अत्यंत निर्दयपणे, दाटीवाटीने आणि कोणत्याही सुविधा नसताना कोंबून वाहतूक केल्याचे दिसून आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही जनावरे तातडीने खाली उतरवून स्थिती नियंत्रणात आणण्यात आली. वाहनातील उर्वरित जनावरे पोलिसांनी आयशरसह कुसुंबा गोशाळेत सुरक्षित हलवली. एकूण २५ गोवंशीय जनावरे मिळून आली असून त्यांची किंमत विविध वयोगटानुसार ९ हजार ते २० हजारांपर्यंत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यात बैल, गाई व वासरे यांचा समावेश आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गोवंश संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.









