उद्योजकांना आकर्षित करून उद्योगधंदे आणण्याचा करणार प्रयत्न
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- शहरात एमआयडीसी आहे. मात्र त्याचे प्रश्न खूप आहेत. अनेक उद्योजकांनी प्लॉट घेतले, मात्र अनेक वर्षांपासून त्यांनी कुठलेही उद्योग सुरू केला नाही. जागा केवळ पडित आहेत. अशा प्लॉट धारकांना नोटीस देऊन त्यांचे प्लॉट ताब्यात घेणार आहेत. ज्यांना उद्योग व्यवसाय करायचे आहेत अशा गरजूंना हे प्लॉट दिले जातील. तसेच नवीन उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी काही सवलती देण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी दि. १७ ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जळगाव जिल्हा नियोजन भवन येथे नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अहवाल सादर केला. जिल्हा प्रशासनाकडून चांगले काम सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच जिल्ह्यात शहीद स्मारकासाठी निधी मंजूर करणे आणि जळगाव व धरणगाव येथे रिंगरोड साठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. गेल्या २ दिवसात ५ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे त्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्याचीही माहिती अजित पवार यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीसाठी पुरेसा निधी मिळत नाही. अर्थसंकल्पात भरीव व वाढीव निधी मिळावा ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी असून पुढील अर्थसंकल्पावेळी अधिक तरतूद जळगाव जिल्हा नियोजन समितीसाठी आम्ही करू असेही त्यांनी सांगितले.
जळगावमध्ये उद्योग धंदा सुरू होण्यासाठी उद्योजकांना आकर्षित केले जाईल. त्यासाठी काही सवलती देण्याचा प्रयत्न राहील. तसेच ज्यांनी वर्षानुवर्षे प्लॉट घेतले आहेत मात्र तिथे कुठलाही उद्योग सुरू केला नाही अशांना नोटीसा देणार व प्लॉट ताब्यात घेतले जातील. जे गरजू आहेत अशांना उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी हे प्लॉट दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. जळगाव शहरात सिमेंटचे रस्ते निकृष्ट दर्जाचे बनत आहेत. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, सिमेंट रस्त्याचे काम खराब असेल तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची सोय आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी असे ते म्हणाले. मंगळवारपासून कंत्राटदारांचा संप आहे याविषयी विचारले असता, त्यांचे ४ हजार ६०० कोटी रुपये रिलीज केले असल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले.