संशयित तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव (प्रतिनिधी): शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने छळाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

प्रांजल रमेश ठाकूर (वय १६, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. प्रांजलने राहत्या घरात छताच्या लोखंडी गळाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ जानेवारी रोजी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास घडली. मयत प्रांजलची आई मनिषा रमेश ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी सोनू दिनकर कचाटे (वय ३२, रा. एकनाथ नगर, जळगाव) हा प्रांजलला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देत होता. आरोपी तिला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि वेळप्रसंगी मारहाण देखील करत होता. या जाचाला कंटाळून आणि प्रचंड दबावाखाली असल्याने प्रांजलने घरात कोणी नसताना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सोनू दिनकर कचाटे याला २५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २:२६ वाजता अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करत आहेत.








