पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण हालचाल
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बैठक आज दि. २१ मे रोजी मंत्रालयातील दालन क्रमांक १०१ येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीचे अध्यक्षस्थान उद्योग मंत्री उदय सामंत भूषविणार असून, ही बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विशेष विनंतीवरून घेण्यात येत आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एमआयडीसीचा डी प्लस झोनमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहून शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. याच मुद्द्यावर त्यांनी स्वतः उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा केली होती. त्यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी डी प्लस झोनमध्ये समावेशाचा विचार सकारात्मक असल्याचे स्पष्ट करत वचनही दिले होते. परिणामी, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निर्णायक बैठकीकडे लागले आहे.
या बैठकीत जळगाव औद्योगिक विकास महामंडळाचा डी प्लस झोनमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव सविस्तरपणे मांडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी वाढतील आणि औद्योगिक संरचना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीत जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात दूरगामी परिणाम करणारा निर्णय यातून होण्याची शक्यता असल्यामुळे, जिल्ह्याच्या विकासासाठी ती एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.