जळगावात पीएसआयचा उर्मटपणा ; पालकांकडून उकळले हजार रुपये
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात आर. आर. विद्यालयाजवळ विद्यार्थ्याला घरी घेऊन जात असलेल्या पालकाला एका पीएसआयने उर्मट भाषा वापरून त्यांच्याकडून हजार रुपये जबरदस्तीने उकळल्याची घटना घडली आहे. याबाबत पालकाने पोलिस अधीक्षकांकडे अर्ज देऊन त्या पीएसआयवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

देविदास श्रीराम कांडेलकर (रा. नवीन जोशी कॉलनी, जळगाव) यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.या तक्रारीत म्हटले आहे की बुधवारी दि. १० रोजी ते संध्याकाळी त्यांच्या मुलाला घेऊन आर. आर. विद्यालयाजवळून घराकडे जात असताना त्यांना पीएसआय सुमेरसिंग चौहान यांनी अडवले. त्यांनी थेट २ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास वाहन ट्रॅफिक ऑफिसला जमा करावे लागेल असे सांगितले. पैसे न दिल्यास १० हजार रुपयांचा दंड करावा लागेल, असे सांगून उर्मट भाषा वापरली.
त्यांना कांडेलकर हे समजावीत असताना त्यांनी, माझी सर्व्हिस तीन ते चार महिने राहिली आहे. मी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे नातेवाईक आहे. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही अशी उद्दाम भाषा वापरली. तसेच १ हजार रुपये कुठलीही पावती न देता जबरदस्तीने घेतले. याबाबत कांडेलकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊन लक्ष देऊन घेतले आहे. सदर पोलिसावर कारवाई व्हावी अशी मागणी देविदास कांडेलकर यांनी केली आहे.









