खेळ, मार्गदर्शन आणि विरंगुळ्याने महिलांचा उत्साह द्विगुणित
जळगाव प्रतिनिधी : मकर संक्रांतीचे औचित्य साधून तेली प्रदेश महिला मंडळ जळगाव आणि शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील तेली समाज भगिनींसाठी भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पांझरापोळ येथील शाळा क्रमांक ३ जवळील परिसरात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट दैनंदिन कामाच्या व्यापातून महिलांना काही क्षण आनंदाचे मिळावेत आणि समाजातील महिला संघटित व्हाव्यात, या उदात्त हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


‘मनासारखा विरंगुळा आणि समाजाची एकजूट’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या सोहळ्यात केवळ पारंपरिक हळदी-कुंकू न होता, महिलांसाठी विविध खेळ आणि मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित महिलांनी खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले, तसेच कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक भगिनीला ‘वाण’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम तेली समाज महिला महानगराध्यक्ष मनीषा प्रदीप चौधरी, निर्मलाताई चौधरी आणि बेबाबाई सुरेश चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार झाला.
सूत्रसंचालन सुनंदाताई चौधरी, डॉ. सुषमा चौधरी आणि डॉ. सुजाता प्रदीप चौधरी यांनी आपल्या शैलीत कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिया चौधरी, आशा चौधरी, मेघा चौधरी, सारिका चौधरी, प्रतिभा चौधरी, अनिता चौधरी, कविता चौधरी, लताबाई चौधरी आणि उषा चौधरी यांनी परिश्रम घेतले. प्रशांत सुरळकर, प्रमोद चौधरी, विनोद चौधरी आणि उमेश चौधरी यांचे या सोहळ्याला मोलाचे सहकार्य लाभले. या भव्य सोहळ्यामुळे जळगाव शहरातील तेली समाज महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.









