फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा
फैजपूर (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील म्हैसवाडी गावात जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत एका ६५ वर्षीय महिलेवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्रांताबाई अर्जुन सपकाळे (वय ६५, व्यवसाय – मजुरी, रा. सावदा रेल्वे स्टेशन, ता. रावेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, म्हैसवाडी गावातील पांडुरंग पंडित पांडव यांनी अमोल विनोद पांडव यांच्याविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याच कारणावरून आरोपी अमर राजू मोरे व अनिता राजू मोरे (दोघे रा. आंबेडकर नगर, म्हैसवाडी, ता. यावल) यांनी संतापातून वाद घालत हाणामारी केली.
यावेळी आरोपींनी फिर्यादी तसेच साक्षीदार रंजना साजन पांडव यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या. दरम्यान, रंजना पांडव यांच्या उजव्या हाताच्या करंगळीवर चाकूने वार करून दुखापत करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.









