प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
वावडदा (वार्ताहर) : म्हसावद रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट क्रमांक १४४ रेल्वे रुळांच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार असून, वाहनधारकांनी आणि ग्रामस्थांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सिनियर सेक्शन इंजिनिअर (रेलपथ) पाचोरा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांच्या देखभालीचे आणि दुरुस्तीचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या काळात गेटवरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या गेटच्या बंद होण्यामुळे म्हसावद, पाथरी, बोरनार, कुन्हादडे, वावडदा, विलवाडी, नागदोली आणि एरंडोल परिसरातील ग्रामस्थांना प्रवास करताना अडचणी येऊ शकतात. या संदर्भातील सूचना म्हसावद रेल्वे स्टेशन मास्टर, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत आणि एरंडोल बस डेपोला देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने कळवले आहे की, कामाच्या स्वरूपाकडे पाहता नागरिकांनी सहकार्य करावे आणि रेल्वे गेट बंद असेपर्यंत नियोजित प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
केव्हा बंद राहणार ?
सुरुवात : मंगळवार, ११ जानेवारी २०२६ (सकाळी ०७:०० वाजेपासून)
समाप्ती : गुरुवार, १४ जानेवारी २०२६ (संध्याकाळी १८:०० वाजेपर्यंत)
(नोंद: पत्रात कामाचा कालावधी १३ आणि १४ जानेवारी असा उल्लेख असला तरी, सूचना ११ तारखेपासून लागू करण्यात आली आहे.)









