जळगाव (प्रतिनिधी ) – शिवाजीनगर भागातील हुडको परिसरात महापालिकेचे कर्मचारी पाणी सोडण्यासाठी जात असतांना दोन जणांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमाकांत चव्हाण (वय-५८, रा. पिंप्राळा शिवार ) महापालिकेत वालमन आहेत . ते शहरातील विविध भागात पाणी सोडण्याचे काम करतात. मंगळवारी उमाकांत चव्हाण त्यांच्या दुचाकीने हुडको भागात पाणी सोडण्यासाठी जात असतांना जनार्दन कोळी आणि गणेश (पुर्ण नाव माहित नाही) (दोन्ही रा. शिवाजी नगर ) यांनी चव्हाण यांचा रस्ता आडविला. दोघे दारूच्या नशेत होते. तु पाणी लवकर सोड असे सांगून उमकांत चव्हाण यांना तोंडावर व डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. त्याच्या दुचाकीचे नुकसान केले व शासकीय कामात अडथळा केला. उमाकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रात्री शहर पोलीस ठाण्यात जनार्दन कोळी आणि गणेश या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सपोनि जगदीश मोरे करीत आहेत.