नवीमुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आरेमधील 800 एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. ‘आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण, आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही’ असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आरे कॉलनीत एमएमआरडीएमार्फत मेट्रो कारशेड बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आरेतील 2646 झाडांची कत्तल करण्यात येणार यामुळे प्रचंड प्रमाणात होणाऱ्या या वृक्षतोडीला मुंबईकरांचाच नव्हे तर देशभरातून तीव्र विरोध होत होता, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या घोषणेमुळे मुंबईकरांसह पर्यावरणप्रेमींना दिलासा मिळाला आहे.







