रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : मेंढपाळ वस्तीत वीज कोसळून एक तरुण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शिवारातील बहिरमबुवा शिवारात घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दादाराव सोना कोळपे (वय २५, रा मुंजलवाडी, ता. रावेर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. काही मेंढपाळांनी बहिरमबुवा शिवारातील शेतांमध्ये राहूट्या टाकून मेंढ्याचे वाडे थाटले आहेत. सायंकाळी काही जण गप्पा करीत असताना अचानक वीज कोसळली. त्यात दादाराव हा ठार झाला तर त्याच्याजवळ बसलेले मोहन काशीनाथ कोरडकर (२२) व चांगदेव सोना कुरपे (२३, दोन्ही रा मुंजलवाडी, ता. रावेर) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. चिंधा बुधा नेमाने यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सदर घटनेचा पंचनामा होऊन मयताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त झाली आहे.