रावेर पोलिसांची दमदार कामगिरी
रावेर ( प्रतिनिधी ) – येथील नेहेते परिसरात एका मेंढपाळाच्या पेटीतून पावणे दोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत केवळ १२ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला असून एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

मेंढपाळ खडू भिका सगर हे आपल्या कुटुंबासह नेहेते येथील शेत शिवारात मुक्कामाला होते. शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या बैलगाडीवर ठेवलेल्या पेटीतून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. शेत शिवार असल्याने तपासात काही अडचणी येत होत्या, तरीही गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले.
कसून चौकशी केली असता, महिलेने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी महिलेकडून १ लाख ४२ हजार रुपये किमतीचे चांदीचे तीन कडे आणि ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील फुले, असा एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पो.हे.कॉ. विजय चौधरी, विक्रम सिसोदे, चैतन्य नरखेडे, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, गजानन बोने आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.









