मु्ंबई – विधिमंडळाच्या 2 दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरेकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.
फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

लोकांचे प्रश्न मांडता येऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नच उपस्थित होऊ नये, यासाठी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर जरुर खर्च करा पण आधी शेतकऱ्यांना पैसा द्या, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.
मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न?
राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन तरी सुरु आहे. पण महाराष्ट्रात मराठा समाजाचं आंदोलन दाबलं जात आहे. मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे. राज्यात ही एकप्रकारे आणीबाणीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्रावर बोलावं. दिल्ली, अमेरिकेवर बोलल्यामुळं राज्यातील प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. बांधावर जाऊन दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मराठा, ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही आवाज बुलंद करणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
चर्चेपासून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न- दरेकर
अधिवेशन काळात सभागृहात चर्चा होणं अपेक्षित असतं. पण दोन दिवसांचं अधिवेशन घेत सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. एक दिवस शोक प्रस्ताव आणि दुसऱ्या दिवशी काय चर्चा होणार आहे? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. महाराष्ट्र अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्यासमोर मराठा आरक्षण, शेतकरी, कोरोना असे अनेक प्रश्न असताना त्यावर चर्चाच करायची नाही म्हणून दोन दिवसाचं हिवाळी अधिवेशन ठेवल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.
विरोधकांकडे मुद्दाच नाही- अजित पवार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. आधीच्या सरकारचे वकिल कायम ठेवले आहेत. विरोधकांकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही. त्यांना राजकारण करायचं असेल, गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कुणी रोखू शकत नाही, अशी टीका अजित पवार यांनी भाजपवर केली आहे.
90 कोटीचा आकडा आला कुठून?
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची बातमी आहे. त्यावर मंत्र्यांच्या बंगल्यावर 90 कोटी रुपये खर्च झालेला नाही. त्याबाबत आपण माहिती घेतली आहे. त्याबाबत अजून आकडेच समोर आलेले नाहीत, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे.







