आमदार मंगेश चव्हाण यांचे जाहीर सभेत आव्हान
चाळीसगाव (प्रतिनिधी) – “माझ्याकडे द्यायला फक्त विकास आहे. याशिवाय मी दुसरे काहीच देऊ शकत नाही. तुम्हाला विकास हवा असेल तर माझ्यासोबत या; पण जर भूलथापा आणि खोट्या आश्वासनांची अपेक्षा असेल, तर ती विरोधकांकडे आहे.” अशा थेट शब्दांत आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या भाषणातून जनतेसमोर विकास विरुद्ध दिखावा असा मुद्दा स्पष्ट ठेवला. शहरातील हिरापूर रोडवरील प्रभाग क्रमांक १० मध्ये झालेल्या “दणदणीत” जाहीर सभेत ते कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित करत होते.

सभेला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. उत्साही कार्यकर्त्यांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले. आपल्या दमदार भाषणात आमदार चव्हाण म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांत मी फक्त काम केलं, बोललो नाही. शहराच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज आणि शैक्षणिक सुविधा या सर्व पातळ्यांवर सुधारणा घडवून आणल्या. पण काही जणांना जनतेची दिशाभूल करायची सवयच लागली आहे. ते केवळ टीका आणि आरोपांवर राजकारण करतात.”
ते पुढे म्हणाले, “मी राजकारणात सत्ता किंवा पदासाठी नाही, तर सेवेच्या ध्यासाने आलो आहे. मला विकासाचेच राजकारण करायचे आहे. तुमच्यासाठी मी निधी आणला, योजना आणल्या, आणि शहराच्या प्रत्येक भागात प्रत्यक्ष काम केले. आता तुमच्याच हातात निर्णय आहे – तुम्हाला विकास हवा की विरोधकांच्या गप्पा?”
सभेदरम्यान विविध प्रभागातील नागरिकांनी आमदार चव्हाण यांच्यासमोर स्थानिक समस्याही मांडल्या, त्यावर त्यांनी तातडीने संबंधित विभागांना सूचना दिल्या. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, नळजोडणींचे विस्तारकाम, नवीन पाणीपुरवठा योजना, तसेच युवांसाठी क्रीडांगण उभारणी यासारख्या अनेक योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सभेच्या शेवटी नागरिकांनी “विकास हवा, मंगेशभाऊच हवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. चव्हाण यांनी शेवटी उपस्थित जनतेचे आभार मानत पुन्हा जनतेच्या विश्वासास पात्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या जाहीर सभेमुळे चाळीसगावातील आगामी राजकीय समीकरणांना नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.









