संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा आक्रोश
मुंबई (वृत्तसेवा) : बदलापूर प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने या चकमकीत अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र, या घटनेवर अक्षयच्या आईवडिलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. माझ्या मुलाला मारून टाकण्यात आलं. त्याला साधा फटाका फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा सवाल अक्षयच्या आईने केला आहे.
अक्षयच्या आईवडिलांनी या प्रकरणावरच संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आईवडिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याच्या आईने तर थेट पोलिसांवर आरोप केला आहे. माझ्या पोराची वाट बघतेय, माझा पोरा असं करूच शकत नाही. माझा पोरगा असा नाही. दुसऱ्यानेच गुन्हा केला. आरोप माझ्या पोरावर दाखल केला. माझ्या पोरानं असं काही केलं असतं तर कामावर गेला नसता. माझा पोरगा भोळा आहे. त्याने असं काही केलं नाही. माझ्या पोराला गोळी घालून मारून टाकलं. आम्हाला मारून टाका आम्ही येतो. कोणत्या हॉस्पिटलला टाकलं तिथेच येतो, आम्हालाही मारा, असं अक्षयच्या आईने म्हटलं आहे. माझा पोरगा फटका फोडू शकत नाही. तो बंदूक काय चालवेल? माझा पोरगा गाड्याना घाबरायचा. आम्ही रोजचं काम करून जगणारे लोकं आहोत. आम्हीही आता जगणार नाही. आमच्या पोरासोबतच जाणार आहोत, असं त्याची आई म्हणाली.