डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील कान-नाक-घसा तज्ञांचे यश
जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कान-नाक-घसा तज्ज्ञांनी दुर्बिणीद्वारे मायक्रोलॅरीन्जल शस्त्रक्रियेद्वारे शेतमजुराच्या व्होकल कॉर्डवरील गाठ यशस्वीरित्या काढली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा आवाज पूर्ववत झाला असून, त्याला पुन्हा स्पष्ट बोलता येऊ लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दोनगाव येथील विजय भालेराव (वय४५) हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तसेच बकरी चारण्याचे काम देखिल ते करतात. या रूग्णाला काही महिन्यांपासून आवाजात बदल जाणवू लागला. सुरुवातीला हा बदल किरकोळ असल्याने त्याने दुर्लक्ष केले. मात्र, हळूहळू त्याचा आवाज पूर्णपणे बदलला आणि त्याला बोलताना त्रास होऊ लागला. शेवटी, त्याने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात कान-नाक-घसा तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल यांची भेट घेतली. डॉ. अग्र्रवाल यांनी त्याच्या विविध आवश्यक तपासण्या केल्या.
कॉर्डवर गाठ असल्याचे निदान
तज्ज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी आवश्यक तपासण्या करून व्होकल कॉर्डवर गाठ असल्याचे निदान केले. ही गाठ वाढल्यामुळे रुग्णाचा आवाज पूर्णपणे बदलला होता. तसेच रूग्णाला किडनीचाही गंभीर आजार होता. त्यामुळे भूलशास्त्र तज्ञ भूल देण्यासाठी विचार करीत होते. मात्र कान-नाक-घसा तज्ञांनी जोखीम स्विकारत अधिक वेळ न दवडता तज्ज्ञांनी दुर्बिणीद्वारे मायक्रोलॅरीन्जल शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला.मायक्रोलॅरीन्जल शस्त्रक्रिया करताना मायक्रोस्कोपच्या मदतीने गाठीवर अचूक लक्ष केंद्रित केले गेले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्होकल कॉर्डवरील ही गाठ अत्यंत सूक्ष्म शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढून टाकण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित असून रुग्णाला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज पडली नाही. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. जान्हवी बनकर, डॉ. रितू रावल, डॉ. चारू सोनवणे यांनी सहकार्य केले. तसेच ही शस्त्रक्रिया योजनेंतर्गत करण्यात आली.
आवाजात सकारात्मक बदल
शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रुग्णाच्या आवाजात सकारात्मक बदल दिसून आला. त्याला पुन्हा स्पष्ट बोलता येऊ लागले असून, त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे.
व्होकल कॉर्डवरील गाठीमुळे अनेक रुग्णांच्या आवाजावर परिणाम होतो. मात्र, मायक्रोलॅरीन्जल शस्त्रक्रिया हे एक सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे. यामुळे रुग्णाचा आवाज पुन्हा पूर्ववत होऊ शकतो. या रुग्णाला वेळीच निदान व योग्य उपचार मिळाल्याने त्याचा आवाज सामान्य झाला, हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात अद्ययावत तंत्रज्ञानाने केल्या जाणार्या अशा शस्त्रक्रिया अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहेत.
– डॉ. अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख, नाक-कान-घसा.