धरणगाव तालुक्यातील वैजनाथ शिवारात गिरणा नदीपात्रातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील वैजनाथ, टाकरखेडा परिसरातील गिरणा नदीपात्राच्या किनाऱ्यावर ट्रॅक्टरमध्ये रेती भरत असताना एका तरुणाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २७ रोजी सकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली असल्याची चर्चा ग्रामस्थांत जोरदार सुरु आहे. सदर तरुण हा शौचासाठी नदीपात्रातील किनाऱ्यावर गेला यावेळी त्याच्या अंगावर मातीचा ढीग पडून तो जागीच मृत झाला असल्याचे आज संध्याकाळी चर्चा सुरु होती. दरम्यान, हे प्रकरण दाबले गेले असल्याबाबत ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत पंचक्रोशीतील पोलीस पाटील, पाळधीचे पोलीस यांनी मात्र अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही माहिती मिळाली असून त्यांनी घटनेची विचारपूस सुरु केल्याचे समजत आहेत.
गिरणा नदीपात्रात बंदी असतानाही अनेक जण वाळूवाहतूक करीत असताना दिसून येतात. गुरुवारी सकाळी पहाटे वैजनाथ परिसरात गिरणा नदीच्या किनाऱ्यावर ट्रॅक्टरमध्ये वाळू भरीत असताना एका तरुण मजुराच्या अंगावर बाजूच्या टेकडीच्या मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर पडला. त्याखाली तो दबला जाऊन जागीच मयत झाला. मात्र प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधित घटनास्थळावरील संशयित लोकांनी तत्काळ त्याला घेऊन परराज्यातील त्याच्या गावाला नेल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.
त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेला नाही. तसेच, पोलिसांना कुठलीच माहिती मिळालेली नाही. घटनास्थळ निर्जन असल्याने संशयिताना तत्काळ प्रकरण दाबता आल्याची माहिती मिळत आहे. मात्र शुक्रवारी ग्रामस्थांना याची कुणकुण लागताच, धानोरा, वैजनाथ, टाकरखेडा, पाळधी, बांभोरी, कढोली आदी गावांत याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान,धरणगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. उद्धव ढमाले व पाळधी पोलीस स्टेशनचे सपोनि प्रमोद कठोरे,आज शुक्रवारी संध्याकाळी या घटनेची सत्यता तपासण्यासाठी नदीपात्रात व किनाऱ्याजवळ घटनास्थळ शोधण्यासाठी गेले आहे. मात्र काय आढळले याबाबत माहिती मिळाली नाही.