“इफको”कडून जनजागृती मोहिम, कृषीच्या नव्या तंत्रज्ञानाचं ड्रोन उडान
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. केळी व कापूस उत्पादनात देखील जळगाव जिल्हा मोठा हातभार लावतो. मात्र शेती करतांना बळीराजाला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी आणि मातीच आरोग्य सुधारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरासह नॅनो युरियाचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी “इफको नॅनो शेतकरी जागृती व्हॅन” मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, कमी खर्च आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्तिथीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान आणि नॅनो खत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नक्किच फायद्याचे ठरणार आहे. भारत सरकारच्या इफको कंपनीने एक नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. नॅनो लिक्विड यूरिया हे यूरियाच्या तुलनेने तीन पट अधिक उपयोगाचे आहे. या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे.
तसेच इफको कंपनीने जिल्ह्यातील १२ महिलांना ड्रोन दीदी अंतर्गत प्रशिक्षण देत ड्रोन उपलब्ध करुन दिले आहे. ड्रोन खरेदी करुन कमी खर्चात शेतकरी फवारणी करु शकतात. या नवीन उपक्रमांचा वापर करुन शेतकऱ्यांचा खर्च कमी करुन उत्पन्नात वाढ होणार आहे. पर्यावरण पुरक असलेल्या नवीन नॅनो खतांचा व ड्रोन तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त माहिती घ्यावी व त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, पद्मनाभ म्हस्के आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.