चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारातील घटना
चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील धनवाडी शिवारात माती वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत एका ५४ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धनवाडी ते गरताड रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली.
धनवाडी येथील नंदकिशोर देवसिंग चौधरी (वय ५४) आणि सुभाष रुपसिंग चौधरी (वय ६२) हे आपल्या शेतातून दुचाकीने घरी परतत होते. याच वेळी धनवाडीहून गरताडकडे मातीने भरलेला एक ट्रॅक्टर अत्यंत वेगाने येत होता. या भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नंदकिशोर चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमी सुभाष चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात वाळू आणि माती वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. या वाहनांमुळे छोटे-मोठे अपघात सातत्याने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक हितेंद्र देशमुख, आबा देशमुख, उद्योजक रवींद्र पाटील, भरत देशमुख यांच्यासह नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
भरधाव वेगाने अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांविरुद्ध पोलीस आणि महसूल प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.









