जळगाव महापालिका मतदानासाठी मतदारांचा उत्साह

आमदार राजूमामा भोळे यांनी बजावला सहपरिवार मतदानाचा हक्क
लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला आहे. लोकशाहीच्या या उत्सवात शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सकाळीच सहपरिवार मतदानाचा हक्क बजावून नागरिकांसमोर आदर्श ठेवला. त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवले.
यावेळी आमदार भोळे यांच्यासोबत माजी महापौर सीमाताई भोळे, महायुतीकडून बिनविरोध निश्चित झालेले उमेदवार विशाल भोळे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार भोळे म्हणाले की, “लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे.”
शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तरुण मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. प्रशासनाकडून सर्व केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण शहरात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत सुरू आहे. सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग समाधानकारक असून दुपारपर्यंत यात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.









