११ विधानसभेसाठी ७९ ईव्हीएम मशीन बदलावे लागले, सी – व्हिझीलच्या २७५ तक्रारी निकाली
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेनी सूक्ष्म नियोजन केल्यामुळे मतदान सुरळीत पार पडले. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात एकूण ११ हजार ७६२ बॅलेट युनिट वापरण्यात आले. त्यातील फक्त्त ७९ यंत्र बदलावी लागली. मतदार यादी अपडेटमुळे यावेळी एकही तक्रार आली नाही, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
मतदान केंद्रावरील टीमला जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून वेगवेगळ्या टप्यात ५ मेसेज देण्यात आले. त्यातला पहिला संदेश सकाळी ९० मिनिटापूर्वी करायच्या कामाच्या सूचना, त्यात मतदान प्रतिनिधीची नियुक्तीपत्र, त्यांची मूळ स्वाक्षरी व इपिकची खात्री करूनच त्यांना प्रवेश द्यावा. सकाळी ९० मिनिटच्या अगोदर
बॅलेट युनिट जोडून ठेवावे. ९० मिनिटे अगोदर अभिरूप मतदान सुरु करावे. मतदान सुरु झाल्यानंतर करावयाच्या कामाच्या सूचना त्यात स्थलांतरीत व मयत मतदारांची यादीमध्ये नाव असलेल्या मतदाराची ओळख स्वतः मतदान केंद्राध्यक्ष यांनी करून घ्यावी. सायंकाळी ६ वाजता उपस्थित मतदारांना उलट्या क्रमाने चिठ्या द्याव्यात.
मतदार यादीत स्थलांतरीत आणि मयत यांचे नाव वगळून १ लाख ४३ हजार नवीन मतदाराची नोंद करण्यात आली. त्यामुळे फारशा तक्रारी आल्या नसल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिकाधिक सुविधा देण्यात आल्या होत्या. आरोग्याच्या सुविधेमुळे २५ ठिकाणी रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
११ विधानसभा मतदार संघात एकूण ३६८३ मतदान केंद्र पैकी २९६५ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात आले, म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक मतदान केंद्रातून वेबकास्टिंग करण्यात आली. राज्यात सर्वाधिक वेबकास्टिंग जळगाव जिल्ह्यात करण्यात आली. याचे नियंत्रण अल्पबचत भवन मध्ये करण्यात आले. या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, निवडणूक आयोगाच्या सामान्य निरीक्षक यांचे बारकाईने लक्ष देऊन त्रुटी दुर केल्या. या ॲपवर एकूण २७५ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर जिल्ह्यातील १९५० कॉल सेंटरवर ८७९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
प्राप्त तक्रारींमध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघातून ४, रावेर विधानसभा मतदार संघातून १, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ५, जळगांव शहर विधानसभा मतदार संघातून २१, जळगाव ग्रामीण मतदार संघातून ४, अमळनेर मतदार संघातून १४, चाळीसगाव मतदार संघातून ७१, पाचोरा विधानसभा मतदारसंघातून ४९, जामनेर विधानसभा मतदारसंघातून १०, तर सर्वाधिक मुक्ताईनगर मतदारसंघातून ८९ अशा एकूण २६८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीचे दखल घेत तात्काळ या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.