जैन आगम ठाणांगसुत्र सांगते की, माता, महात्मा आणि परमात्मा यांचे आशीर्वाद जीवनाला उन्नत करतात. माता-पिता, मालक आणि गुरू यांच्याप्रती सतत कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. यात आईचे ऋण तर असीम आहे, जे कुणाला, कधीही फेडता येणारे नाही. असे श्रमणीसूर्या राजस्थान प्रवर्तिनी महासतीजी डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी धर्मसभेत सांगितले. प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी सांगितले की, या जगात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात: उद्याची चिंता करणारा ‘संसारी’ आणि भवाची (जन्म, जीवनाची) चिंता करणारा ‘साधक’ सुलभबोधी, दुर्लभबोधी आणि मनुष्याच्या सात भयांपैकी मृत्यू भय याबाबत अनुशंगिक प्रकाश टाकला.
तीर्थंकर भगवान महावीर यांच्या महानिर्वाणानंतर ९८० वर्षांनी देवार्धिक्षमा श्रमण यांनी १२ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आगमसूत्र लिपीबद्ध केले. गणधर आणि देवार्धिक्षमामुळे हे ज्ञान आज आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्यांचे उपकार अनंत आहेत. त्याच प्रमाणे देवार्धिक्षमाच्या पूर्वजन्म व मनुष्य लोकात जन्म घेतल्यावर त्यांच्या जीवनात घडलेल्या सर्व गोष्टी, आगम लिपीबद्ध करण्याबाबतची प्रेरणा, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांचे संयम जीवन इत्यादी बाबत सविस्तरपणे प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी सांगितल्या.
माता-पिता, मालक आणि गुरू यांच्याविषयी मनात सतत जागृत भाव ठेवावा, असे आवाहन डॉ. सुप्रभाजी यांनी केले. राजा तोडरमल आणि त्यांच्या आईच्या असीम मायेची प्रेरणादायी कथा सांगितली. शत्रूच्या आक्रमणात मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने कष्टमय जीवन स्वीकारले. आजची पिढी अनेकदा आई-वडिलांना चुकीची वागणूक देते. पण जर देव, गुरू आणि धर्माविषयी आई वडिलांची श्रद्धा कमी होत असेल, तर मुलांनी ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असे केल्याने त्यांच्या ऋणातून थोडे का होईना.. उतराई होता येईल, असे महत्त्वाचे सूत्र प्रवचनांती दिले गेले.
आर.सी. बाफना स्वाध्याय भवन, जळगाव.
दि. १२/०७/२०२५,
(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, जैन इरिगेशन जळगाव.)