११२ क्रमांकावर खोटी माहिती देणाऱ्या पाचोर्याच्या तरुणावर गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘उद्या जळगाव मध्ये बॉम्ब फुटणार आहे, पोलीस मदत हवी आहे’ अशी खोटी माहिती पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर देणाऱ्या पाचोरा येथील २८ वर्षीय तरुणावर पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण लक्ष्मण पाटील (वय २८, रा. कृष्णापुरी ता. पाचोरा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील यांनी फिर्याद दिली आहे. बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कॉन्स्टेबल शरद पाटील हे कर्तव्यावर असताना किरण पाटील याने त्याच्या मोबाईल नंबरवरून फोन करून सांगितले की, उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार आहे. पोलीस मदत हवी आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता तरुणाने केवळ खोटे बोलून दिशाभूल केल्याचे दिसून आले.
त्यामुळे पाचोरा पोलीस स्टेशन येथे किरण लक्ष्मण पाटील याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान ११२ क्रमांकावर खोटी माहिती देणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे.