पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील महाराणा प्रताप चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर बालाजी डोसा सेंटरवर गॅस सुरू करत असतांनाच गॅसहंडीचा अचानक स्फोट झाल्याने त्यात आई व मुलगा गंभीर भाजला गेला. त्यांच्यासह एक जण जखमी आहे. त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुळचे वेरूळी खुर्द तालुका पाचोरा येथील रहिवासी असलेले व गेल्या दिड वर्षांपासून पाचोरा येथील संघवी कॉलनीत राहून इडली डोसाच्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करीत असलेले ईश्वर संतोष पाटील (वय ३२) व त्यांची आई लताबाई संतोष पाटील (वय ५२) हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता दुकानात आल्यानंतर साफसफाई केली.(केसीएन) त्यांनतर इडली व डोसा बनविण्यासाठी लताबाई यांनी गॅस सिलिंडर पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन दोघे मोठ्या प्रमाणात भाजले गेले. तर एकजण जखमी झाला आहे. तिघांना तब्येत अत्यवस्थ असल्याने जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
घटनास्थळी तात्काळ विज वितरण कंपनीचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. गॅस सिलिंडर फुटल्यानंतर त्यांचा आवाज जवळपास अर्धा किलोमीटर दूरपर्यंत आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.(केसीएन)या स्फोटामुळे दुकानाची पत्रे व संपूर्ण सेट, टेबल खुर्च्या, भांडे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दुकान मालकाचे सुमारे ३ ते ४ लाखाचे नुकसान झाले आहे. याशिवाय आजूबाजूला असलेल्या तीन ते चार दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरण्यात आला असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.