पोलीस ठाण्याच्या आवारात मृतदेह ठेऊन नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
भडगाव ( प्रतिनिधी )– शहरातील २४ वर्षीय तरूणाला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली संतप्त नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
सद्दाम अली फतरू अली (वय-२४ , रा. यशवंत नगर, वरची बर्डी भडगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे. सद्दाम अली हे पत्नी यास्मीन व तीन मुलांसह राहत.होते बांधकामावरील सेटींगचे काम करून उदरनिर्वाह करत होते . शनिवारी रात्री सद्दाम अली नवीन पारोळा रोडवर ताडीच्या दुकानावर गेले . त्याठिकाणी चार ते पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दरम्यान सद्दाम हा बेशुध्दावस्थेत पडलेला असल्याची माहिती सद्दामचा भाऊ मोहब्बत अली याला मिळाली. त्यांनी तातडीने भावाला उचलून पाचोरा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले परंतू वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले.
मयत सद्दामला मारहाण का केली होती याबाबत अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मयत सद्दाम अलीच्या नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन करत संशयितांना अटक करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली होती . दरम्यान, पोलीसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
मयत सद्दामच्या पश्चात वडील फतरू अली रमजान अली, आई परवीनबी, भाऊ मोहब्बत अली, पत्नी यास्मीन, दोन मुली शुमेरा, जोया आणि ६ महिन्याचा इम्रान मुलगा असा परिवार आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन भडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले.