अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे दोन महिलांसह तिघांव गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पातोंडा येथे कुत्र्याच्या पिल्लूला मारताना रोखल्याचा राग आल्याने एका महिलेसह तिच्या मुलाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दि. १२ जुलै रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी दि. १३ जुलै रोजी एकाच कुटुंबातील तिघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावात कलाबाई नाना भोई या मुलगा राजेंद्र नाना भोई यांच्यासह राहतात. भाजीपाला विक्री करून त्या उदरनिर्वाह करतात. दरम्यान, शुक्रवारी दि. १२ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील मुकेश प्रकाश पांचाळ हा गावातील ग्रामपंचायत जवळ कुत्र्याच्या पिल्लूला लाकडी दांडक्याने मारत असतांना कलाबाई यांनी मारहाण करू नको असे सांगितले.(केसीएन)याचा राग आल्याने मुकेश प्रकाश पांचाळ, सरलाबाई प्रकाश पांचाळ आणि पायल मुकेश पांचाळ यांनी महिलेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.
ही घटना घडत असतांना भांडण सोडविण्यासाठी आलेला कलाबाई भोई याचा मुलगा राजेंद्र भोई याला देखील लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शनिवार १३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे मुकेश पांचाळ, सरलाबाई पांचाळ आणि पायल पांचाळ तिघे रा. पातोंडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव हे करीत आहे.