चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – खेडगाव येथील विहिरीत आढळून आलेल्या अज्ञात इसमाचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून मेहुणबारे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
२३ सप्टेंबररोजी खेडगाव शिवारातील दत्तात्रय कोठावदे यांच्या शेतातील विहीरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करून पोलीसांनी तपास केला. अनोळखी मयताची ओळख पटविण्याकरीता मेहुणबारे पोलीसांनी मयताचे फोटो वर्तमानपत्रे, सोशल मिडीयावर व्हायरल केले होते.
मयत व्यक्ती बोरखेडा बुद्रुक येथील सोमनाथ प्रभाकर पाटील असल्याची माहिती मिळाली. बोरखेडा बु. येथील अजबराव प्रभाकर पाटील यांचा भाऊ सोमनाथ पाटील (वय ३५ रा. ) हा दिनांक २१ सप्टेंबररोजी बोरखेडा गावातील भिकन पाटील याच्यासोबत मोटार सायकलवर बसुन गेला मात्र परत आलेला नाही अशी माहिती पोलिसांना मिळाली. भिकन पाटील याला सोमनाथबाबत विचारले असता त्याने त्याचदिवशी न्हावे गावी सोमनाथ पाटील गेला असल्याचे अजबराव यांना सांगितले होते. सोमनाथचा शोध न लागल्यामुळे अजबराव यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सोमनाथ पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अजबराव यांना मेहुणबारे पोलीसांनी अकस्मात मृत्यु मधील अनोळखी मयताचे फोटो, कपडे, बुट दाखविले त्यांनी भाऊ सोमनाथ प्रभाकर पाटील याचेच असल्याचे ओळखल्याने अज्ञात मयताची ओळख पटविण्यात मेहुणबारे पोलीसांना यश आले होते.
सोमनाथचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या भावाने स.पो नि पवन देसले यांच्याकडे व्यक्त केला होता. पोलीसांनी प्रविण ऊर्फ भिकन पाटील आणि भटु वसंत सोनवणे ( रा. कळमडु ) यांचेकडे व इतरही अनेक संशयीतांकडे आलटुन पालटुन चौकशी केली होती. संशयीत वेळोवेळी उवाडवीची उत्तरे देत होते. मेहुणबारे पोलीसांनी त्यांच्या हालचालींवर गोपनियरित्या पाळत ठेवुन त्यांच्याविषयी तांत्रीक विश्लेषकांची मदत घेवुन अभ्यासपुर्ण तपास केला त्यांच्या सतत बदलत जाणार्या जबाबावरुन त्यांचेवर नजर ठेवण्यात आलेली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर भिकन पाटील व भटु सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आले त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे.
भिकन पाटील आणि भटु सोनवणे यांनी पोलिसांना सांगितले की, २१ सप्टेंबररोजी सकाळी नऊ वाजता भिकन पाटील हा सोमनाथ पाटील याला त्याच्या मोटारसायकलवर बसवुन खेडगाव येथे आला . दुपारी सोमनाथ दारु पिऊन शेतात आला असता त्याला भिकन पाटील याने तु येथे दारु प्यायला आला आहे की, कामाला आहे ? अशी अपमानास्पद अश्लिल शिवीगाळ केली सोमनाथ पाटील व भिकन पाटील यांच्यात मारामारी झाली. या भांडणात भिकन पाटील याने दारुच्या नशेत असणार्या सोमनाथ पाटील याला लाथ मारुन पाण्याने तुडूंब भरलेल्या विहीरीत ढकलुन दिले. यानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले. यानंतर सोमनाथ पाटील न्हावे येथे दारु पिण्यासाठी गेला तो परत आला नाही, अशी सोमनाथच्या नातेवाईकांना व गावात खोटी बतावणी केली.
२३ सप्टेंबररोजी सोमनाथ पाटील याचे प्रेत विहीरीतुन वर फुगुन आल्यानंतर भिकन पाटीलचा शालक भटु सोनवणे याने प्रेताची माहिती भिकन याला फोनद्वारे दिल्यावर भिकनने वाच्यता कोणालाही न करण्याबाबत भटुला सांगितले यामुळे भटु सोनवणे यानेदेखील माहिती पोलीसांना न देता लपवुन ठेवुन भिकन पाटील यास गुन्हयात मदत केली असल्याचे निष्पन्न झाले. मेहुणबारेचे स पो नि पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे, उपनिरीक्षक योगेश ढिकले, प्रकाश चव्हाणके, प्रताप मथुरे, सिध्दांत शिसोदे, हनुमंत वाघेरे , गोरख चकोर, शैलेश माळी यांच्या पथकाने हा तपास केला .