मुंबई ( वृत्तसंस्था ) – मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना, “मागील सरकारचे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रूपये देण्यात येतील” असा शब्द दिला होता. हा दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
मागील सरकारने केवळ 10 लाख रूपये देण्याचा शब्द दिला होता पण फक्त 15 कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपये देण्यात आले त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने या निर्णयामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. यापूर्वी पाच लाख रूपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी पाच लाख रूपये व शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख दिले जाणार आहेत .