डॉ. निलेश चांडक यांच्या अभूतपूर्व प्रयत्नांना यश
जळगाव ( प्रतिनिधी ) – वयाच्या पंचाहत्तरीत अनेक जण आयुष्याची दोरी सैल झाली असं मानतात. पण बोदवड येथील शांताबाई धनगर यांनी या विचाराला छेद देत, दुर्धर अशा जठराच्या कॅन्सरवर यशस्वी मात केली आहे. कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि डॉक्टरांच्या योग्य उपचारांमुळे शांताबाई आज पुन्हा निरोगी आयुष्य जगत आहेत.
बोदवड शिवारातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील शांताबाई धनगर यांना जेवणात त्रास होऊ लागला आणि झपाट्याने वजन घटू लागले. त्यांचे वजन केवळ ३० किलोवर आले होते. ही परिस्थिती पाहून त्यांच्या मुलाने तातडीने त्यांना जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉ. निलेश चांडक यांच्या टीमने तपासणी केली असता, त्यांच्या जठरात कॅन्सर असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, हा कॅन्सर मोठ्या आतड्यांपर्यंत पसरला होता. या वयात अशी शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. आतड्यांच्या जोडणीमधून द्रव गळती होणे किंवा न्यूमोनिया सारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका होता.
मात्र, शांताबाईंच्या कुटुंबाने ही जोखीम पत्करून शस्त्रक्रियेसाठी संमती दिली. रुग्णाच्या सकारात्मकतेने आणि कुटुंबाच्या विश्वासाने डॉ. निलेश चांडक आणि त्यांच्या टीमचा आत्मविश्वास वाढला. डॉ. चांडक यांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून जठर आणि मोठ्या आतड्यांचा बाधित भाग काढून टाकला. यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच शांताबाई पुन्हा जेवण करू लागल्या आणि त्यांची प्रकृती सुधारू लागली. डॉ. चांडक यांनी या यशाचे श्रेय त्यांच्या टीमला आणि शांताबाईंच्या नातेवाईकांनी दाखवलेल्या सकारात्मक मानसिकतेला दिले आहे. ‘मरण नको, उपचार द्या’ या विचाराने शांताबाईंनी कॅन्सरवर विजय मिळवला असून, त्यांच्या या लढ्यामुळे अनेकांना नवी उमेद मिळाली आहे.