गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याचा विसर्ग मन्याड मध्यम प्रकल्पात येत आहे. यामुळे मन्याड प्रकल्प कधीही पूर्ण क्षमतेने भरून त्यातून गिरणा नदीत विसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना सावधानतेच्या सूचना देण्यात येत आहेत.
नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे मन्याड प्रकल्पातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. कोणत्याही क्षणी मन्याड प्रकल्प पूर्ण भरून त्यातून गिरणा नदीत पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते, असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.(केजीएन)या पार्श्वभूमीवर मन्याड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील आणि गिरणा नदीच्या काठावरील गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. नदीपात्रात किंवा नदीकाठावर गुरेढोरे घेऊन जाऊ नये, तसेच मच्छिमारी किंवा इतर कामांसाठी नदीजवळ जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल सेवकांना या सूचना गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाला तात्काळ कळवावे.