एका गुणाने हुकला दुसरा नंबर, क्यूसीआयच्या मूल्यांकनात दिसून आली सर्वोत्तम कामगिरी
जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) यांच्या संयुक्त मूल्यमापनातून राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यातील ५७ मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत थेट तिसरा क्रमांक पटकावला आहे. या विभागाने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली २०० पैकी १७०.५० अधिक गुण मिळविले आहेत.

महाराष्ट्र शासन आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) यांच्या संयुक्त मूल्यमापनातून राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने २०० पैकी १८६.५० गुणांनी प्रथम, तर वन विभागाने १७१.५० गुणांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. मात्र, ग्रामीण भागाशी थेट निगडित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग १७०.५० गुणांनी तिसऱ्या क्रमांकावर येणे ही मोठी प्रशासकीय उपलब्धी मानली जात आहे.
राज्यभरातील हजारो गावे, कोट्यवधी नागरिक आणि मूलभूत गरजांशी संबंधित असलेल्या या विभागाची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. गावागावात नळ पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी, शौचालयांचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ गाव अभियान, डिजिटल फाईलिंग, वेळेत निर्णय प्रक्रिया आणि नागरिकाभिमुख सेवा, या सर्व आघाड्यांवर राज्याने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ठोस कामगिरी केली आहे. “काम फक्त कागदावर नाही, तर गावात दिसलं पाहिजे” ही स्पष्ट भूमिका घेत संबंधित विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला सातत्याने गतिमान ठेवले. त्याचा थेट परिणाम या राज्यस्तरीय गुणांकनात दिसून आल्याची भावना प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.








