मागण्यांवर निर्णय नसल्याने अंगणवाडी सेविका संतप्त
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- अंगणवाडी सेविकांचे वेतनवाढ या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून बेमुदत संप सुरु आहे. नागपूरच्या विधानमंडळाच्या अधिवेशनात मागण्यांवर कुठलाही निर्णय न झाल्याने गुरुवारी २१ रोजी इचलकरंजी येथे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे अंगणवाडी सेविकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारून बोंबाबोंब केली.
अंगणवाडी सेविका ह्या ४ डिसेंबर पासून संपावर आहेत. आज संपाचा १८ वा दिवस आहे. विधान मंडळात वेतनवाढीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. तसेच, मानधनवाढीसंदर्भात माहिती देताना त्यांनी बेताल वक्तव्ये केल्यामुळे अंगणवाडी सेविका संतप्त झाल्या होत्या. म्हणून त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारून बोंबाबोंब केली. तसेच दैनंदिन आहार पुरवठाबाबतच्या परिपत्रकाची होळी केली. यावेळी सुनील बारवडे, ज्योती हजारे, गंगू माने, अलका टकले, रेखा जगताप, दीप कवाडे, पुष्पलता माने आदी २०० अंगणवाडी सेविका उपस्थित होते.