डीवायएसपी आप्पासो पवार यांचे प्रतिपादन
राज्यस्तरीय युवा मानसशास्त्र परिषदेत विविध विषयांवर मंथन
जळगाव (प्रतिनिधी) – मोबाईलमध्ये सोशल मीडियावर अधिक वेळ वाया घालवणे हेदेखील एक व्यसन आहे. गेम, चॅटिंग, व्हिडिओ या माध्यमातून मानसिक आजार जडण्याची शक्यता अधिक असते. यात समुपदेशकांची मदत महत्वाची ठरते, असे प्रतिपादन प्रशिक्षणार्थी डीवायएसपी आप्पासो पवार यांनी व्यक्त केले.
सायकॉलॉजिकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे युवा मानसशास्त्रीय राज्यस्तरीय परिषद २०२३ चे आयोजन जळगाव येथे गिरणा नदीच्या काठावर जलाराम बापा मंदिर येथील सभागृहात करण्यात आले होते. परिषदेमध्ये दुपारी रोहिणी अचवल स्मृती पुरस्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक आप्पासो पवार, डॉ. नितीन भारंबे, पुरस्कार समानार्थी प्रा.डॉ.सोपान बोराटे, सायकॉलॉजिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप शिसोदे, परिषदेचे समन्वयक नितीन विसपुते उपस्थित होते.
यावेळी दिवसभरातील परिषदेचा आढावा अध्यक्ष संदीप शिसोदे यांनी घेतला. त्यानंतर प्रा. डॉ. सोपान बोराटे यांना सपत्निक मान्यवरांच्या हस्ते रोहिणी अचवल् स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी,मिळालेल्या पुरस्काराबद्दल आभारी असून पुढील काळात तरुणांच्या समुपदेशनाबाबत सक्रियतेने काम करण्यासाठी पुढाकार घेईल असे प्रा. डॉ. बोराटे यांनी सांगितले.
सोशल मीडिया मधील नकारात्मकता, दिशाहीन झालेला तरुण यामुळे युवकांचे बिघडत आहे. त्यांना समुपदेशक आपल्या समुपदेशनामुळे योग्य दिशा दाखवू शकतात असे मनोगत आप्पासो पवार यांनी व्यक्त केले.
सायकॉलॉजिकल वेल्फेअर असोसिएशनच्या मार्फत राज्यभरात युवकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास झाला पाहिजे. हा अभ्यास होत असताना तरुणांचे मनस्वास्थ्य चांगले कसे राहील, याबाबत सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. नितीन भारंबे यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. अजित पाटील यांनी केले. परिषदेला महाराष्ट्रभरातून ४०० जणांची उपस्थिती होती.
उद्घाटन
युवा मानसशास्त्र राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी प्रास्ताविकामध्ये परिषद घेण्यामागील भूमिका परिषदेचे समन्वयक नितीन विसपुते यांनी व्यक्त केली. तर सायकॉलॉजिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप शिसोदे यांनी संस्थेविषयी माहिती देऊन परिषद घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील राज्य शासनाचे मानसिक आजार विभागाचे प्रमुख, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. संजय कुमावत, प्रा. डॉ. शांताराम बडगुजर, प्रा. डॉ. सोपान बोराटे उपस्थित होते. सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव डॉ. अजित पाटील यांनी केले.
परस्पर संवाद तुटत चालल्यामुळे युवकांच्या आत्महत्या वाढत आहेत – बिजभाषण
उद्घाटनानंतर मुंबई येथील डॉ. संजय कुमावत यांनी बीजभाषण सादर केले. तरुणांना मोकळे होण्यासाठी व्यासपीठ, स्थळ किंवा साधन अपेक्षित असते. मात्र त्यांना मिळत नाही. त्यामुळे गुंतागुंतीचे मनस्वास्थ्य निर्माण होते. तरुणांच्या प्रश्नांकडे आजकाल फारसे लक्ष दिले जात नाही. परस्पर संवाद तुटत चालला आहे.
त्यामुळे टीनएजर्स पासून आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. आव्हाने निरनिराळी आहेत. पण युवा वयोगटातील तरुणांना आव्हाने पेलतांना कठीण जाते. “लोक काय म्हणतील” हा प्रश्न त्यांना सारखा पडत असतो. मात्र हा प्रश्न चुकीचा आहे. तरुणांनी संवादी राहणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी बीज भाषणातून सांगितले.
चर्चासत्रांमधून युवकांच्या मनस्वास्थ्यावर मंथन
राज्यस्तरीय परिषदेमध्ये दोन चर्चासत्र झाले. यात पहिल्या चर्चासत्रात ‘युवकांचे मनस्वास्थ्य : एक आव्हान’ या विषयाचे निवेदन मुंबई येथील विशाल गाणार यांनी केले. तज्ज्ञ म्हणून मुंबई येथील डॉ. संजय कुमावत, वर्धा येथील डॉ. रूपाली सरवदे आणि जळगावच्या डॉ. अपर्णा मकासरे यांनी सहभाग घेतला.
आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, तर वेळी–अवेळी आणि वारंवार होणारे बाहेरचे खाणे, व्यायामाचा कंटाळा, अभ्यास, करिअर, मित्रमंडळी, प्रेमसंबंध अशा विविध पातळ्यांवर वावरताना मनावर येणारा आणि दुर्लक्षित राहणारा ताण, मित्रांच्या संगतीने आयुष्यात कधी तरी होणारा मद्यपान वा धूम्रपानाचा प्रवेश, अशा कित्येक गोष्टी तरुण वयात घडत असतात.
तरुणांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि चांगले वळण येण्यासाठी योग्य दिशा दाखविणाऱ्या चांगल्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येणे महत्त्वाचे आहे तरुण असतानाच आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या तर ताण काहीसा कमी होतो, असे मंथन या चर्चासत्रात मान्यवरांनी केले.
दुसरे सत्र
दुपारी दुसऱ्या सत्रात “समुपदेशनातील सकारात्मकता” या विषयावर इस्लामपूर येथील कालिदास पाटील यांनी निवेदन केले. चर्चासत्रात जळगावचे डॉ. विवेक काटदरे, प्राचार्य प्रा. डॉ. सी.पी. लभाणे, मु. जे. महाविद्यालयाचे डॉ. राणी त्रिपाठी यांनी सहभाग घेतला.
मानसशास्त्रीय समुपदेशनाची गरज नक्की कोणाला, हा प्रश्न बऱ्याचदा चर्चेत येतो. खरे तर प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही गरज भासतेच. समुपदेशन त्या प्रत्येकासाठी, जो भावनिक व शारीरिक समस्यांना सामोरा जात आहे. ज्या समस्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होत आहे. आणि ज्याला यातून सुयोग्य काढून आनंदी व सुदृढ व्हायचे आहे, त्याला समुपदेशन महत्वाचे आहे.
समुपदेशनाचा अचूक अवलंब केल्यास एखादी समस्या तीव्र होण्यापासून वाचते. आपल्या अडचणीच्या काळात आप्तेष्टांचा आधार घेताना नकारात्मकदृष्टय़ा मते निर्माण होतात. अशावेळी शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेले समुपदेशक ही भूमिका योग्य तऱ्हेने बजावून, आत्मीयतापूर्वक सुयोग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरक व पोषक वातावरण निर्माण करू शकतात.