जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींची आज बुधवार दि. ७ रोजी बिनविरोध निवड निश्चित झाली असून उद्या गुरुवारी दि. ८ रोजी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.
प्रभाग समिती सभापतींच्या निवड प्रक्रियेसाठी बुधवारी शेवटच्या दिवशी चारही प्रभागांमधून भाजपतर्फे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. यात प्रभाग क्रमांक-१ मधून प्रतिभा सुधीर पाटील; प्रभाग क्रमांक-२ मधून मनोज आहुजा; प्रभाग क्रमांक-३ मधून सुरेखा नितीन तायडे तर प्रभाग क्रमांक-४ मधून उषा संतोष पाटील यांचा समावेश आहे. यामुळे या चारही सभापतींची बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चीत झाले आहे.
दरम्यान, चारही उमेदवारांनी अर्ज दाखल करतांना भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारतीताई सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर ललीत कोल्हे, अॅड. शुचिता हाडा, राजेंद्र घुगे-पाटील, चेतन संकत, विशाल त्रिपाठी, महेश चौधरी, प्रवीण कोल्हे, सरिता नेरकर, डॉ. चंद्रशेखर पाटील, वंदना पाटील, रेखा पाटील,सदाशिव ढेकळे, जितेंद्र मराठे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.