जळगाव ( प्रतिनिधी ) ;-गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या ९६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश आज मनपाला प्राप्त झाले असून महापौर जयश्रीताई महाजन यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा केला होता त्याला यश आले आहे.
मनपाला प्राप्त आदेशात म्हटले आहे कि, रोजंदारी कर्मचारी मधुकर कोल्हे यांनी सेवेत कायम करण्यासंदर्भात कामगार न्यायालयात दावे दाखल केले होते. कामगार न्यायालयाने सेवेचा लाभ न दिल्याने कामगार न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मनपात १० मार्च १९९३ पूर्वी नियुक्त झालेले ३९ व ११ मार्च १९९३ नंतर नियुक्त झालेले ५७ अशा एकूण ९६ कर्मचाऱ्यांना अटी व शर्तीनुसार मनपा आस्थापनेवरील रिक्त पदांवर सामावून घेण्यास मान्यता देण्याचे म्हटले होते. त्यांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे असे उच्च न्यायालयाचे आदेशानुसार सामावून घ्यावे असे आदेश उप सचिव शंकर जाधव यांनी आज काढले आहेत.