मानसोपचार तज्ज्ञांकडे इलाजासाठीच परिवाराने आणले होते जळगावात
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून सोमवारी सकाळी ११ वाजता एक मनोरुग्ण तोल जाऊन पडला होता. तो गंभीर जखमी झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर वामन सूर्यवंशी (रा.कमळगाव ता.चोपडा) असे त्यांचे नाव आहे. त्याच्या मागे पत्नी आणि तीन मुले आहेत. ज्ञानेश्वर सूर्यवंशी काही दिवसांपासून मानसिक आजारी होते डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी बहीण शोभाबाई राजाराम वाघ ( रा. गांधी मार्केट,जळगाव ) यांच्याकडे परिवारासह आले होते. एक महिन्यापासून ते कामावरून घरीच होते.
कमळगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय येथे शिपाई म्हणून कार्यरत होते अनेक दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन ठीक नव्हते त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी परिवाराने त्यांना शनिवारी संध्याकाळी बहिणीकडे जळगावात आणले होते. सोमवारी रिंग रोडवरील एका दवाखान्यात मानसोपचार तज्ज्ज्ञांना दाखविणार होते. तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. हात ,पाय फॅक्चर झाला . छाती, पायाला व शरीराला मुका मार लागला होता . त्याला राहुल भोई या तरुणाने तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील , शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव, डॉ.गोपाळ ढवळे आणि सहकारी त्याच्यावर उपचार करीत होते .
या कुटुंबप्रमुख इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी मृत्यू झाला याबाबतची माहिती शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी दिली.