पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात महिलेसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पीडित महिला विवाहित असून लग्नानंतर काही दिवसांनी तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे ती सध्या आपल्या माहेरी भावाकडे राहत होती. दि. २३ ऑक्टोबरच्या सायंकाळी, गावातील दोन तरुणांनी सदर महिलेस दुचाकीवर बसवून नेले. दोघांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांमध्ये पसरताच खळबळ उडाली. त्यानंतर पीडितेच्या भावाला हा सर्व प्रकार समजला. भावाने तत्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडून तत्काळ कारवाई होऊन या प्रकरणी मंगेश पवार व सोहील खान या दोन संशयित तरुणांविरोधात भारतीय दंडसंहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांकडून पुढील तपास जलद गतीने सुरू आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत असून, गावकऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.









