मनोरुग्णाचा भाजपवर नेमका संताप का ?

जळगाव (प्रतिनिधी) – येथील भारतीय जनता पक्षाच्या “वसंत स्मृती” या कार्यालयावर शनिवारी रात्री एका मनोरुग्णाने दारात कचरा टाकून कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. याच मनोरुग्णाने मागील आठवड्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ तर निरीक्षकांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. या मनोरुग्णाचा भाजपवर नेमका संताप तरी कशासाठी आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
विजय श्रीरंग पवार (वय ४०) रा. पत्रकार भवनाजवळ, जळगाव याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश भगवानदास पंडित यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री संशयित विजय पवार याने काडीकचरा गोळा करून भाजपच्या कार्यालयात आणून टाकला व पूर्ण दरवाजा पेटवून दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास एएसआय यु.एस.त-हाटे करित आहे.
मागील आठवड्यात भाजपचे निरीक्षक आले असताना संध्याकाळी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. तसेच गिरीश महाजन यांना शिवीगाळ केल्याचीही चर्चा त्यावेळी झाली. यावेळीहि संशयित विजयला कुठलीही तक्रार नसल्याने सोडून देण्यात आले होते. आता तर थेट कार्यालयच जाळण्याचा प्रयत्न विजय पवारने केला. त्यामुळे भाजपवर त्याचा काय राग आहे हाच मोठा प्रश्न आहे.







