शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अस्थिव्यंगोपचार विभागामध्ये मंगळवारी १२ मार्च रोजी ‘मणक्याचे आजार : निदान व उपचार’ याविषयी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी लाभ घेण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मणक्याचे आजार या संदर्भामध्ये मुंबई येथील स्पाईन फाउंडेशनच्या टीमने जळगावच्या रुग्णालयात सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी १२ मार्च रोजी ज्या रुग्णांना कमरेचे दुखणे, सायटिका, स्पॉंडीलाइटिस, स्लिप डिस्क, कमरेच्या वेदना, पायाला सारख्या मुंग्या येणे, पायाची ताकद कमी असणे असे मणक्याचे विविध आजार असतील तर त्यांनी तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात सकाळी ९ ते १२ या वेळेमध्ये कक्ष क्रमांक ११५ या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे.
तपासणी दरम्यान गरजू रुग्णास जर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली तर शस्त्रक्रिया देखील करून मिळणार आहे. त्यासाठी एप्रिल महिन्यात मुंबई येथील स्पाईन फाउंडेशनचे नामांकित व सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर्स यांची टीम रुग्णालयात येणार आहे. रुग्णांनी मणक्याच्या दुखण्यासंदर्भात आयोजित तपासणी शिबिराला उपस्थिती द्यावी, असे आवाहन अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.