अमळनेर तालुक्यात महावितरणने दिली तक्रार
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मंगरूळ येथील शिरूड रस्त्यावर सुमारे १२ गाळ्यातून ४० हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा चोरीस गेल्या तर ट्रॅक्टरने धडक दिल्याने ५ सिमेंट पोल व तारा तुटून ४० हजार असे एकूण ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दि. ४ व ६ डिसेंबर रोजी घडल्या आहेत. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुनील रतन महाजन यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीबी ९१९६) ने दि. ४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एमआयडीसी भागात ३ सिमेंट पोलला धडक दिल्याने ५ पोल व २ स्टे तुटून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. दुसऱ्या घटनेत, दि. ६ रोजी शिरूड रस्त्यावरील एमआयडीसीत शिवारात स्वप्नील प्रकाश पाटील व जयेश अरविंद पाटील या दोन्ही ग्राहकांच्या बंद कनेक्शनसाठी असलेल्या प्रत्येकी ६ गाळ्यातील २०० केव्हीच्या ४० हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियमच्या विद्युतवाहक तारा चोरून नेल्याचे उघडकीस आले. दोन्ही घटनेत अभियंता विजय माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.