लवकरच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल थांबणार
चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्याचे आ. लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना मंगरूळ फाटा ते मंगरूळ गाव रस्त्याचे बंद झालेले कामाविषयी मंगरूळ ग्रामवासीयांतर्फे निवेदन देऊन रस्त्याचे काम पुन्हा चालू करण्यासाठी शुक्रवारी १७ रोजी निवेदन देण्यात आले.
येत्या आठवड्याभरात पुन्हा मंगरूळ रस्त्याचे काम चालू होईल असे आ. सोनवणे यांनी आश्वासन दिले व त्यासोबत जलजीवन मिशन अंतर्गत जलजीवन योजनेसाठी ५९ लाखाचा जो निधी आलेला होता, त्याचे जे काही काम सुरू होते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते त्याविषयी सविस्तर चर्चा आ. सोनवणे यांचे सोबत करण्यात आली. त्या कामाची तात्काळ चौकशी करावी व त्याचे फोटो व छायाचित्रण व्हिडिओ सहित आमदार सोनवणेंना दाखवण्यात आलेले आहे. लवकरच संबंधित कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
मंगरूळ गावात जाणारा रस्ता हा ११ ते १२ वर्षांपासून झालेला नाही. तो आता मूर्त स्वरूपात येत आहे. गावात येणारी एसटी बस देखील बंद झाली होती. त्यामुळे लहान मुले, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यांची प्रचंड हाल होत होते. याबाबत आ. लताताई सोनवणे यांनी स्वतः लक्ष घालून समस्या सोडवण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिलेले आहे.









